Translate

Wednesday, September 3, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ११ -

||श्रीराम समर्थ|| 
नाम –

११) आयुर्वेदाने रोग मुळापासून जातो. पण त्याला वेळ लागतो. तसे नामाने वेळ लागेल पण सर्व रोग मुळापासून जाईल. इंग्रजी औषधाने रोग वरवर नाहीसा होतो किंवा इंजेक्शन दिल्याने दुःखाची जाणीव कमी होते, पण रोग आत असतोच. तसे इतर साधनाचे आहे.

~~ श्रीराम. नामाचे महत्त्व सांगताना जी अनेक उदाहरणे महाराज देत त्यातील हे एक महत्त्वाचे उदाहरण. मनुष्य परमार्थाला लागतो तो रोगाचे- भवरोगाचे निर्मूलन होण्यासाठी. ह्या भवरोगाला कारण असते ते माणसाचे मन- त्याचे विकार- त्याच्या भगवंताशिवाय असणाऱ्या वृत्ती. जोवर या बाबींवर नियंत्रण येत नाही, तोवर रोगाचे उच्चाटन अशक्य. “मन एव कारणं बंधमोक्षयोः” असे म्हणतात ते याच कारणासाठी. हे मन बदलणे ही प्रक्रिया सुरु झाली म्हणजे माणूस परमार्थाला लागला असे म्हणता येईल. “नाम” हे असे साधन आहे, जे यावर रामबाण औषध आहे. इतरत्र भटकणाऱ्या मनाला आवर घालण्यासाठी नाम हे आयुष्याचे सर्वोत्तम मूल्य झाले पाहिजे असे परमपूज्य बाबा बेलसरे अनेक ठिकाणी सांगतात.

वर म्हटल्याप्रमाणे नाम हे मुळापासून बदल घडवून आणणारे असे एकमेव साधन आहे. नाम हे भक्तिमार्गाचे मर्म आहे. ज्ञानमार्गामध्ये हा बदल माणसाला स्वतःच्या मनावर आहार-विहार यांच्या संयमाने बळजबरीने आणावा लागतो. त्याशिवाय ज्ञानमार्ग पुढे चालू शकत नाही. भक्तिमार्गात- नाममार्गात मात्र जेव्हा भगवंताच्या प्रेमाने भिजून जाऊन भक्त त्याला आवडीने पुकारतो- नाम घेतो- तेव्हा त्याचे मन आपोआप त्या धारेमध्ये डुंबू लागते आणि मनाची दृश्याची खेच कमी होते.


यासाठी पूज्य बाबा बेलसरेंनी एके ठिकाणी पाणी आणि अग्नी याचे उदाहरण दिले आहे, जे इथे अतिशय प्रयुक्त आहे. पाणी देखील स्वच्छ करते, त्यात “बदल” (change) घडवते. अग्नी हा जाळून टाकतो आणि रूपांतर (transformation) करतो. म्हणून “नाम” हा अग्नी आहे! हिंदू वेदांमध्ये अग्नीला अतिशय महत्त्व आहे. ऋग्वेदातला पहिलाच मंत्र अग्निमंत्र आहे. तेव्हा असा हा नामरूपी अग्नी मनुष्याचे विकार जाळून टाकतो आणि विकारग्रस्त प्राण्याचे सत्पुरुषात रूपांतर करतो. याचे अजून एक कारण म्हणजे आयुर्वेद जसा पूर्वापार एकाच तत्त्वावर आधारित आहे, तसे नाम हे अनादी अनंत आहे. त्यात बदल नाही, वाढ नाही- घट नाही. असे जे कधीही न बदलणारे असते तेच मनुष्याच्या अंतःकरणाचा ठाव घेऊ शकते आणि त्याच्यात पारमार्थिक परिवर्तन करू शकते. मुळापासून रोग हटवणारा आयुर्वेद आणि नाम यांची यास्तव महाराजांनी समानता दर्शिविली आहे. कदाचित ज्ञानमार्गात लवकर आढळणारी सिद्धी, अनुभव नाममार्गात दिसणार नाहीत, किंवा त्याला वेळ लागेल; परंतु, जे साधेल ते कायमचे असेल ह्यात शंका नाही! 

No comments:

Post a Comment