नाम--
१२) 'मी ब्रह्म आहे' या अनुभवातसुद्धा मीपण आहे. नाम त्याच्याही पलीकडे
आहे.
~~ नामाच्या बाबतीतली श्रीमहाराजांची अत्युन्नत भावना आपण सगळे
जाणतोच. त्या सर्व भावनांमध्ये "Par excellence" म्हणता येईल असे हे बोधवचन आहे. यातून महाराजांना
अध्यात्मामध्ये- साधनामध्ये "मीपणाची" जाणीव गळून पडणे किती महत्त्वाचे वाटत
होते हे समजून येते. मी रामाचा दास आहे असे गर्वाने सांगणाऱ्या महाराजांना
तुकोबांप्रमाणे "अद्वैती तो नाही माझे समाधान, तू देव मी भक्त ऐसे करी" असे वाटत होते ह्यात
नवल ते काय.
नाम हे सर्व दृश्याच्या पलीकडे आहे, एवढेच नव्हे तर नाम म्हणजेच
ओंकार, नामातूनच हे विश्व निर्माण झाले हे महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे.
अदृश्य ईश्वराला जेव्हा हे विश्व निर्माण करण्याची प्रेरणा झाली तेव्हा जे स्फुरण
आले ते म्हणजे नाम! तेव्हा नाम सगळ्याच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच ते अनादी अनंत
आहे! ईश्वर म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच ईश्वर! त्यामुळेच नाम सगळ्याच्या पलीकडे
आणि मोक्षाचे – मुक्तीचे द्वार आहे; किंबहुना नामात राहणे हीच मुक्ती होय!
यामध्ये
अजून एक मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे जोवर अनुभव आहे तोवर द्वैत आहे. त्यामुळे “मी
ब्रह्म आहे” हा अनुभव येतो आहे तोवर द्वैत आहे. अनुभवरूप होणे आणि नामरूप होणे हे
एकच आहे. श्रीमहाराज नामरूप होते. केवळ जगाला नामाचे महत्त्व सांगण्यासाठीच
त्यांचा जन्म होता आणि त्या एकाच ध्येयाने ते आयुष्यभर आणि त्यानंतरही झटले. अशी महती
असणारे नाम घेताना परमपूज्य बाबा बेलसरे म्हणत त्याप्रमाणे “नाम घेताना आपण
काहीतरी अमूल्य वस्तू जपतो आहोत असा भाव ठेवून घ्यावे” हे वाक्य साधकाने
प्राणापलीकडे जपले पाहिजे.
No comments:
Post a Comment