Translate

Tuesday, September 9, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १३ –

नाम— 


१३) नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही.

~~ श्रीराम. शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती आणि आत्मप्रचीती या तिन्ही कसोट्यांवर जे उतरते ते खरे ज्ञान. आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची वचने या तिन्ही कसोट्यांवर पुरेपूर उतरतात असे त्यांचे अनेक शिष्य वरचेवर सांगतात. “नाम” हा माझा प्राण म्हणणारे श्रीमहाराज नामरूप होते आणि त्यामुळेच नाम हे आनंदरूप आहे हे ते ठामपणे सांगू शकले. महाराज अनेक ठिकाणी “शांती”, “आनंद” आणि “समाधान” हे एकाच अर्थाने वापरतात. तेव्हा नाम हेच शांतीरूप आणि समाधानरूप आहे यात शंका नाही.

त्यांना समजले पण मग आम्हाला हे का समजत नाही? असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. महाराजांना काही जणांनी विचारले, नामात लक्ष लागत नाही, काय करावे? महाराजांनी प्रतिप्रश्न केला, “तुमचे लक्ष कशात लागते?” त्यावर काही लोक म्हणाले, “कशातच लागत नाही”. मग महाराज म्हणाले, तुमचे कशातच लक्ष लागत नाही, मग नामात लागत नाही हे साहजिकच आहे. आणखी काही लोक म्हणाले, “काही गोष्टीत (उदा.- करमणुकीच्या साधनांत) आमचे लक्ष लागते; पण नामात लागत नाही.” मग महाराजांनी पुन्हा विचारले, “त्या गोष्टीत का लागते? कारण त्याची तुम्हाला आवड आहे म्हणून!” तीच आवड नामात आली की नामातही लक्ष लागेल.” ही आवड नामात येण्यास उपाय कोणता? तर नाम घेणे, मनापासून नेटाने घेणे हाच त्यावर उपाय आहे.

आपले नाम dry- कोरडे होते. कारण आपण नामाच्या अर्थाकडे लक्ष देत नाही, असे पूज्य बाबा सांगतात. नाम म्हणजे माझा सदगुरुशी – भगवंताशी असलेला थेट दुवा आहे, नाम घेणे म्हणजे जगद्व्याप्त परमेश्वराला आळवणे, त्याला आठवणे आणि “मी तुझा आहे” हे मनात म्हणणे होय. मुख्यतः नाम मध्यमेतून पश्यंती वाणीत गेले की हा अर्थ जास्त स्पष्ट होतो. आणि हे नाम घेत गेले की स्वतःचे स्वतःलाच कळते. तेव्हा बाकीची व्यवधाने थोडी का होईना बाजूला सारून “मी मनापासून नाम घेईन” हा निश्चय व्हावा लागतो. कित्येक लोक सांगतात की नाम घेतल्याने आमचा “Stress” (आज हा परवलीचा शब्द झाला आहे) खूप कमी झाला आहे. आतूनच शांत वाटते. ही नामाची शक्ती आहे. जे नाम प्रत्यक्ष ईश्वर आहे ते जपल्यावर दृश्याच्या पलीकडील शांतीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे सर्व संतांनी छातीला हात लावून सांगितले आहे. तेव्हा त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून नामाशी थोडे तरी तादात्म्य पावण्याचा अनुभव येवो हीच श्रीचरणी प्रार्थना! 

No comments:

Post a Comment