Translate

Tuesday, December 9, 2014

सद्गुरू आज्ञा पालन हा अभ्यास! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली आज्ञा पालन करणं हा अभ्यास आहे. सद्गुरू जे सांगतील ते मला योग्यच सांगतील. तिथे आपली अक्कल चालवायची नाही. त्यांनी जर सांगितलं स्वस्थ बैस, तर हाच अभ्यास आहे. ते जे सांगतील ते! त्याचं कारण असं आहे, की माझं जे कर्म आहे ते संपण्याकरता त्यांच्या आज्ञेचं पालन करणं जरूर आहे. मला याचा अत्यंत फायदा झाला. मला असं पाहिजे, तसं पाहिजे हे माणसाच्या मनातून जाता जात नाही. ते जर जायला हवं असेल तर तुम्ही सांगा मी काय करू ते. एकदा महाराजांना मी असा प्रश्न केला, " समजा, मी आईबापाचं ऐकतो आहे. आईबाप साधी माणसं आहेत. त्यांचा हेतू चांगला पण सध्याची परिस्थिती माहीत नाही. त्यांचं ऐकताना माझं व्यवहारात नुकसान झालं तर?" यावर महाराज म्हणाले, "जिथे हेतू शुद्ध आहे, तिथून जे येतं ते प्रारब्धाला अनुकूलच येतं; त्याच्या उलट होणारच नाही"

अजून एक गोष्ट अशी की कुणाचं तरी ऐकलं पाहिजे ना! माझं म्हणणं असं की या ऐकण्यामध्ये आपल्या बुद्धीला वळण लागतं. तिचा उच्छृंखलपणा कमी होतो. सद्गुरूंचा हेतू काय असतो, तर तुमची कर्मामधील जी आसक्ती असते ती कमी करणं हे त्यांचं काम आहे. क्षुद्र गोष्ट असते पण त्यामागे जी उर्मी असते ती आणि तिचा जोर कमी करणं हा हेतू असतो.

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ८ मधून) 

1 comment:

  1. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete