Translate

Thursday, December 4, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १४ -

||श्रीराम समर्थ|| 

नाम --

१४) नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. काही काळ तो त्या अवस्थेत राहील. त्यातून थोडा खाली आला तर त्याची दृष्टी निराळी असेल. पण नाम पचले की मग तो साध्या माणसासारखाच दिसेल.

~~ श्रीराम. श्रीमहाराज अनेक ठिकाणी सांगतात की नाम व परमात्मा एकच आहेत. आणि जिथे परमात्मा आहे तिथे आनंद असणारच. किंबहुना परमात्मा आनंदरूपच आहे. मनुष्याची काळजी, चिंता, दुःख ही सर्व कालाधीन आहेत. आपल्याला काल घडून गेलेले वज्रलेपासारखे हृदयात कोरले जाते म्हणून ताप, उद्या काय होणार याची चिंता जळते म्हणून व्यग्रता आहे. तेव्हा हा काळ थोडा वेळ का होईना मनुष्य विसरला तर काळजी चिंता दुःख राहणारच नाही असे महाराजांचे कळकळीचे सांगणे आहे. “आलाच आहात तर तुमच्या काळजीचे गाठोडे रामाच्या पायापाशी ठेवून जा ना!” असे महाराज गोंदवल्यास आलेल्या प्रत्येकास सांगत. किती खोल अर्थ आहे त्यामध्ये!

नामात रममाण होणे ही आयुष्याची इतिकर्तव्यता व्हावी असे पूज्य बाबा बेलसरे सतत सांगताना आढळतात. अशा या नामात आहे काय? तर स्वतःला आणि स्व-केंद्रित सर्व गोष्टींना फाटा देण्याचे सामर्थ्य ह्यात आहे. नामाचे प्रेम येणे ही थोडीथोडकी गोष्ट नाही. आत्यंतिक गुरुकृपा आणि तळमळीने केलेले नाम-साधन ह्यातच फक्त नामाचे प्रेम आपणास बहाल करण्याचे सामर्थ्य आहे. स्व गेला की जग गेलेच! कारण आपले जग हे स्वतःभोवतीच गुरफटलेले असते. नामाच्या संगतीत हा विसर पडला तर मनुष्याचे जीवन किती आनंदमय होईल! अविरत प्रयत्न आणि सद्गुरूंची प्रार्थना यानेच हे शक्य होऊन मनुष्य तो आनंद भोगेल. असा हा आनंद भोगलेला मनुष्य साहजिकच चारचौघांच्या सारखा दृश्यात रमणार नाही. त्याच्यात आंतरिक बदल होईल. किंबहुना हा आंतरिक बदल हेच साधनेचे मर्म आहे.


एकदा का अशी गोडी लागली की माणूस त्यात रमूनच जातो. पण याचा अर्थ तो वास्तवाच्या पलीकडे जातो असे नाही. सुरुवातीचा काल कदाचित तो थोडा वेगळा भासेल पण एकदा का नामाची सवय अंगी दृढ झाली की तो सर्व सामान्य मनुष्याप्रमाणेच राहील. सगळ्यात भाग घेईल; परंतु त्याचे मन मात्र नेहमी भगवंताच्या – सद्गुरूंच्या प्रेमाने ओथंबलेले राहील! 

No comments:

Post a Comment