Translate

Sunday, March 22, 2015

भक्ति ~ सा परमप्रेमरूपा.... अमृतस्वरूपा च ...


~~~~ भक्ति ~~~~~ 
<3 सा परमप्रेमरूपा.... अमृतस्वरूपा च <3 

ईश्वरावरील निःसीम पण निस्वार्थी प्रेमास भक्ति असे म्हणतात. भक्ति हा एक अतिशय पवित्र द्विमुखी संबंध आहे. भक्तीमध्ये भक्त आणि ईश्वर दोघे आरंभापासून अखेरपर्यंत शुद्ध प्रेमाने बांधलेले असतात. वेगवेगळ्या आचारधर्मांचे पालन, माळामुद्राधारण, तीर्थभ्रमण, पुण्यस्मरण, इत्यादी सत्कर्मांना लोक भक्ति समजतात. परंतु, जोपर्यंत या सर्व कर्मांचा जन्म ईश्वरावरील निस्वार्थी प्रेमामधून होत नाही, तोपर्यंत त्यांना भक्तीची पातळी व पात्रता येत नाही. 

भक्तीमध्ये प्रेम करणारा हा भक्त हा प्रेमी असतो. भक्त ज्याच्यावर प्रेम करतो, तो ईश्वर अथवा सद्गुरू हा प्रियतम असतो. भक्तीमध्ये भक्त ईश्वराला प्रियतम म्हणून पूर्णपणे स्वीकारतो किंवा त्याचा अंगीकार करतो. या अंगीकार करण्यामागे कोणताही स्वार्थी हेतू नसून केवळ विशुद्ध प्रेमाची प्रेरणा असते. ज्याला आपण आपला म्हणतो, तो आपल्या जीवनात शिरतो. "जगात खरे माझे कोण आहे?" या प्रश्नाला "एकटा ईश्वर अथवा सद्गुरू माझा आहे" असे निश्चित उत्तर तीन्ही अवस्थांमध्ये भक्त देऊ शकतो. 

भक्त ईश्वराच्या नादी लागतो. ईश्वराच्या रूपाने, गुणांनी, लीलांनी मोहित होऊन भक्त ईश्वराच्या श्रवण-मननात रममाण होऊ लागतो. भक्त मनाने सतत ईश्वराला चिकटलेला असतो. त्यामुळे तो सतत ईश्वराच्या सान्निध्यात राहतो. केवळ प्रेमापायी भक्त ईश्वराच्या आधीन होऊन राहतो. 

भक्ताच्या पूजेचे उपचार साधेच असतात पण त्या पूजेमध्ये प्रेमाचा जिव्हाळा असतो. भक्त जेथे जातो, तेथे प्रेमापोटी ईश्वर त्याची सोबत करतो. त्याच प्रेमापायी भक्त स्वतःला ईश्वरामधे अधिकाधिक गमावून बसतो. ईश्वरावर प्रेम करणारा भक्त ईश्वराच्या स्वरूपात संपूर्ण विलीन झाला, की भक्तीची सीमा गाठली असे समजावे! <3 

(परमपूज्य बाबा बेलसरे - प्रेमयोग - सारांश)

No comments:

Post a Comment