Translate

Saturday, March 21, 2015

मानसपूजा !!!


श्रीराम. सर्वांना मन्मथनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा! नामसाधकांसाठी प्रत्येक दिवस खरोखर मुहूर्तासारखाच आहे. सद्गुरूंचे स्मरण जेथे आहे, तेथे रोज पाडवा, रोज दिवाळी. अशा या सद्गुरूंचे अखंड स्मरण राहण्यास नामस्मरणाबरोबरच मानसपूजेसारखा उपाय नाही. पूज्य बाबा अनेक ठिकाणी सांगतात त्याप्रमाणे कुणीही साधक आजवर मानसपूजेशिवाय तयार झाला नाही! मानसपूजा म्हणजे सद्गुरूंचे अखंड संनिधान! म्हणूनच मानसपूजेच्या अखेरीस विश्रांती आहे, विसर्जन नाही! तेव्हा आजच्या या शुभदिनी या मानसपूजेची एक गोड गोष्ट-

गोंदवल्यास महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात पहिले नाम शिबिर झाले. या सप्ताहात पूज्य बाबा बेलसरेंचे मानसपूजेवरील प्रवचन आयोजित केले होते. सगुणरूपातील सद्गुरूंच्या मानसपूजेचे स्वरूप व महत्त्व पहाटेच्या प्रवचनातून पू. बाबा क्रमशः सांगत होते. प्रवचनानंतर सर्व शिबिरार्थी साधक थोडा वेळ मानसपूजेसाठी शांत बसत असत. एक साधक श्रीमहाराजांच्या सगुणरूपाची मानसपूजा करीत असताना पूजा संपल्यावर श्रीमहाराजांना आपल्या घराबाहेर पोहोचवण्यास जात असे. श्रीमहाराज लांबवर गेलेले पाहून तो घरामध्ये येत असे.

शिबिरातील सातव्या दिवशी पू. बाबा मानसपूजेचा शेवट कसा करावा हे सांगत होते. मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना सूक्ष्म रूपात आपल्या हृदयकमळावर विराजमान करावे असे सांगून पूज्य बाबा सर्व साधकांना उद्देशून म्हणाले, “अहो, काय सांगू? साधक मानसपूजेत आपल्या सद्गुरूंना चक्क घराबाहेर हाकलून देतात याला काय म्हणावे!” हे वाक्य ऐकून मानसपूजेत सद्गुरूंना घराबाहेर पोहोचविणारा साधक चांगलाच दचकला. प्रवचन संपताच तो पू. बाबांना भेटला आणि त्यांना म्हणाला, “मानसपूजेत श्रीमहाराजांना मी घराबाहेर घालवून देतो हे आपणास कसे समजले?” हा प्रश्न ऐकून पू. बाबांनी स्मित केले आणि म्हणाले, “आपल्या भक्तांना श्रीमहाराज योग्य मार्गदर्शन करतात असे समजावे!” 

No comments:

Post a Comment