Translate

Monday, March 23, 2015

रामरायाची नवरात्र दिवस ३ रा -- ||श्रीराम जय राम जय जय राम||



शेजारती श्रीरामाला --
परमात्मा श्रीराम महामाया जानकी ।
विश्रांति पावली, गजर न कीजे सेवकी ।।
आरती ऐक्यभावे ओवाळू । श्रीरामा तुम्हासी ओवाळू ।
प्रकाश स्वयंज्योति निजतेजे ओवाळू ।।
स्नेह ना भाजन नाही वाती पावक ।
सबाह्य अभ्यंतरी अवघा निघोट दीपक ।।
ऐक्याचिया सुमनशेजे आत्माराम रघुपति ।
वाचा परुषली शब्द न बोलवे पुढती ।।
राम आणि दास दोघे पहुडले नामी ।
हेही बोलावया दुजा नुरेचि धामी ।।

रामरायाची नवरात्र दिवस २ रा -- ||श्रीराम जय राम जय जय राम||


Sunday, March 22, 2015

भक्ति ~ सा परमप्रेमरूपा.... अमृतस्वरूपा च ...


~~~~ भक्ति ~~~~~ 
<3 सा परमप्रेमरूपा.... अमृतस्वरूपा च <3 

ईश्वरावरील निःसीम पण निस्वार्थी प्रेमास भक्ति असे म्हणतात. भक्ति हा एक अतिशय पवित्र द्विमुखी संबंध आहे. भक्तीमध्ये भक्त आणि ईश्वर दोघे आरंभापासून अखेरपर्यंत शुद्ध प्रेमाने बांधलेले असतात. वेगवेगळ्या आचारधर्मांचे पालन, माळामुद्राधारण, तीर्थभ्रमण, पुण्यस्मरण, इत्यादी सत्कर्मांना लोक भक्ति समजतात. परंतु, जोपर्यंत या सर्व कर्मांचा जन्म ईश्वरावरील निस्वार्थी प्रेमामधून होत नाही, तोपर्यंत त्यांना भक्तीची पातळी व पात्रता येत नाही. 

भक्तीमध्ये प्रेम करणारा हा भक्त हा प्रेमी असतो. भक्त ज्याच्यावर प्रेम करतो, तो ईश्वर अथवा सद्गुरू हा प्रियतम असतो. भक्तीमध्ये भक्त ईश्वराला प्रियतम म्हणून पूर्णपणे स्वीकारतो किंवा त्याचा अंगीकार करतो. या अंगीकार करण्यामागे कोणताही स्वार्थी हेतू नसून केवळ विशुद्ध प्रेमाची प्रेरणा असते. ज्याला आपण आपला म्हणतो, तो आपल्या जीवनात शिरतो. "जगात खरे माझे कोण आहे?" या प्रश्नाला "एकटा ईश्वर अथवा सद्गुरू माझा आहे" असे निश्चित उत्तर तीन्ही अवस्थांमध्ये भक्त देऊ शकतो. 

भक्त ईश्वराच्या नादी लागतो. ईश्वराच्या रूपाने, गुणांनी, लीलांनी मोहित होऊन भक्त ईश्वराच्या श्रवण-मननात रममाण होऊ लागतो. भक्त मनाने सतत ईश्वराला चिकटलेला असतो. त्यामुळे तो सतत ईश्वराच्या सान्निध्यात राहतो. केवळ प्रेमापायी भक्त ईश्वराच्या आधीन होऊन राहतो. 

भक्ताच्या पूजेचे उपचार साधेच असतात पण त्या पूजेमध्ये प्रेमाचा जिव्हाळा असतो. भक्त जेथे जातो, तेथे प्रेमापोटी ईश्वर त्याची सोबत करतो. त्याच प्रेमापायी भक्त स्वतःला ईश्वरामधे अधिकाधिक गमावून बसतो. ईश्वरावर प्रेम करणारा भक्त ईश्वराच्या स्वरूपात संपूर्ण विलीन झाला, की भक्तीची सीमा गाठली असे समजावे! <3 

(परमपूज्य बाबा बेलसरे - प्रेमयोग - सारांश)

Saturday, March 21, 2015

रामरायाची नवरात्र दिवस १ ला -- ||श्रीराम जय राम जय जय राम||


मानसपूजा !!!


श्रीराम. सर्वांना मन्मथनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा! नामसाधकांसाठी प्रत्येक दिवस खरोखर मुहूर्तासारखाच आहे. सद्गुरूंचे स्मरण जेथे आहे, तेथे रोज पाडवा, रोज दिवाळी. अशा या सद्गुरूंचे अखंड स्मरण राहण्यास नामस्मरणाबरोबरच मानसपूजेसारखा उपाय नाही. पूज्य बाबा अनेक ठिकाणी सांगतात त्याप्रमाणे कुणीही साधक आजवर मानसपूजेशिवाय तयार झाला नाही! मानसपूजा म्हणजे सद्गुरूंचे अखंड संनिधान! म्हणूनच मानसपूजेच्या अखेरीस विश्रांती आहे, विसर्जन नाही! तेव्हा आजच्या या शुभदिनी या मानसपूजेची एक गोड गोष्ट-

गोंदवल्यास महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात पहिले नाम शिबिर झाले. या सप्ताहात पूज्य बाबा बेलसरेंचे मानसपूजेवरील प्रवचन आयोजित केले होते. सगुणरूपातील सद्गुरूंच्या मानसपूजेचे स्वरूप व महत्त्व पहाटेच्या प्रवचनातून पू. बाबा क्रमशः सांगत होते. प्रवचनानंतर सर्व शिबिरार्थी साधक थोडा वेळ मानसपूजेसाठी शांत बसत असत. एक साधक श्रीमहाराजांच्या सगुणरूपाची मानसपूजा करीत असताना पूजा संपल्यावर श्रीमहाराजांना आपल्या घराबाहेर पोहोचवण्यास जात असे. श्रीमहाराज लांबवर गेलेले पाहून तो घरामध्ये येत असे.

शिबिरातील सातव्या दिवशी पू. बाबा मानसपूजेचा शेवट कसा करावा हे सांगत होते. मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना सूक्ष्म रूपात आपल्या हृदयकमळावर विराजमान करावे असे सांगून पूज्य बाबा सर्व साधकांना उद्देशून म्हणाले, “अहो, काय सांगू? साधक मानसपूजेत आपल्या सद्गुरूंना चक्क घराबाहेर हाकलून देतात याला काय म्हणावे!” हे वाक्य ऐकून मानसपूजेत सद्गुरूंना घराबाहेर पोहोचविणारा साधक चांगलाच दचकला. प्रवचन संपताच तो पू. बाबांना भेटला आणि त्यांना म्हणाला, “मानसपूजेत श्रीमहाराजांना मी घराबाहेर घालवून देतो हे आपणास कसे समजले?” हा प्रश्न ऐकून पू. बाबांनी स्मित केले आणि म्हणाले, “आपल्या भक्तांना श्रीमहाराज योग्य मार्गदर्शन करतात असे समजावे!” 

Tuesday, March 17, 2015

मृत्युच्या स्मरणाचा साधनासाठी उपयोग!


माझे साधन कमी जास्त प्रमाणात चालू असता मला रोज बारीक ताप येऊ लागला. पुष्कळ डॉक्टरांना आणि वैद्यांना दाखवले तरी काही केल्या ताप थांबेना. त्यामुळे अशक्तपणा येऊन रक्तक्षयाची सर्व लक्षणे दिसू लागली. आयुष्याच्या मध्यावर येऊन मारण्याची माझी तयारी नसल्याने "आपण आत्ताच मेलो तर?" या विचाराची भीती मनात भरली. मला लहानपणापासून मृत्यूचे विलक्षण कुतूहल होते. परंतु ज्यावेळी स्वतःचा देह थकू लागला आणि त्यावर काही उपाय सापडेना तेव्हा मात्र मला अत्यंत काळजी लागली. भीती आणि तिची लाडकी कन्या काळजी या दोघींचे खरे स्वरूप तेव्हा प्रत्यक्ष अनुभवाने मला कळले.

आता दोन तीन वर्षात आपल्याला मरण येणार आणि येथील सगळे जबरदस्तीने येथेच सोडून जावे लागणार अशी आतून माझी खात्री पटली. त्यामुळे मनाने मी अगदी केविलवाणा झालो. जीवाची भयंकर घालमेल होऊ लागली. आपण केव्हातरी मरणार हे प्रत्येकाला ठाऊक असते पण नको असताना जर मृत्यूची चाहूल लागली तर जीवाची होणारी धडपड अनुभवल्यावाचून कळायची नाही.

जगात दिसणाऱ्या पण अखेर जगातच राहणाऱ्या घरदार, पैसाआडका, मानसन्मान इत्यादी गोष्टींवरून माझे मन बरेच उतरले. ** श्रीसद्गुरु आणि त्यांनी दिलेले भगवंताचे नाम या दोघांशिवाय अंतकाळी इतर कोणी आपल्या उपयोगास येणार नाही ** हे सत्य मला स्वानुभवाने समजले. आता कसाही प्रसंग आला तरी त्यामध्ये मन शांत ठेवण्यास नामावाचून अन्य उपाय नाही ही संपूर्ण खात्री झाल्याने तेच नाम मी मनापासून घेऊ लागलो. माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासाच्या तिसऱ्या पायरीला येथून आरंभ झाला. त्या गोष्टीला आज पंचवीस वर्षे होऊन गेली. अजून मी जिवंत आहे पण--

** मरणाचे स्मरण सतत राहिले, तर नामस्मरण उत्तम चालते ** हे साधनमार्गातील एक रहस्य मला उकलले!

Tuesday, March 3, 2015

कालाचा व्यय अगदी जपून!


श्रीराम! आजचे दिवस चटदिशी जाऊन हांहां म्हणता म्हातारपण किंवा मरण येईल ही जाणीव ज्या मानाने वाढते त्यामानाने साधनाची तीव्रता वाढते. 

म्हणून कालाचा व्यय पैशाप्रमाणे अति जपून करावा

~ परमपूज्य बाबा बेलसरे (आनंद साधना)