Translate

Tuesday, January 3, 2017

आज परमपूज्य बाबांचं १९ वं पुण्यस्मरण

परमपूज्य बाबांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन.


|| श्रीराम समर्थ ||

तनू जयांची कृश ओजस्वी
वदनी निर्मळ हास्य वसे।
मधुर भाषणें जनां मनाला
नित्य दिलासा लाभतसे॥

नयनां मधुनी स्नेह कृपेचा

अविरत हो वर्षाव खरा।
सदा सांगती तळमळुनी ते
श्रीरामाचे नाम स्मरा॥


तत्वज्ञान श्री महाराजांचे
साऱ्या जगता बोधियले।
आचरुनी ते स्वये जीवनीं
लोकां नामी लावियले ||


गुरु आज्ञा ही प्रमाण होती
सदा जीवनीं सर्व परी।
सुखदुःखाच्या वाटे वरती
महाराजांची साथ खरी॥


गुरुरायांचा आठव त्यांच्या 
कंठी गहिवर सहज भरे।
ओलावा नयनात दाटता
रोम रोम पुलकीत खरे॥


असे आमुचे बाबा त्यांच्या 
नित नत मस्तक चरणीं हे।
किती सांगती चला लावुया
मन नामाच्या स्मरणीं हे॥


|| जानकी जीवन स्मरण जयजयराम ||


~ स्वानंद ~

श्रीराम 

जये श्रीवचा 
             मानली वेदवाणी |
सदा स्वस्थ जे 
           जीवनीं रामनामीं  ||
किती बोधिती
        तळमळीने जिवाला |
नमस्कार त्या 
        पूज्य श्री केशवाला ||

श्रीराम

स्मरे नाम जो सर्वदा
                प्रीय ज्यांना ।
जया भेटता स्वस्थ 
               वाटे जीवांना ॥
निरोपास श्रीं च्या 
            जनां पोचवीला ।
नमस्कार त्या पूज्य
                श्री केशवाला ॥

               


           ..... स्वानन्द. 



Monday, January 2, 2017

संगत कुणाची करावी?



श्रीराम. ज्यांनी आपले जीवन नामाला वाहिलेले आहे अशांची संगत करावी. अशा व्यक्तीला नुसते जवळून पाहिल्याने व त्यास स्पर्श केल्याने आपली नाम घेण्याची प्रेरणा जोराने उमटते.

नामाचा आपला अभ्यास एका इयत्तेपर्यंत पोचल्यानंतरच नामात मग्न झालेल्या माणसाची व त्याच्या सहवासाची किंमत कळते!

नाममध्ये रमल्यामुळे ज्याला सद्गुरू सान्निध्याचे वरदान मिळाले त्याला मौज भोगण्यासाठी दसरा अन् दिवाळीची वाट पाहण्याची जरूर नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे ~~ 

संन्यास आणि योग



श्रीराम. भगवी वस्त्रे घालणे म्हणजे संन्यास नव्हे. संन्यास म्हणजे सोडणं आणि हे सोडणं वृत्तीचं आहे. जे भगवंताच्या आड येतं ते निश्चयानं सोडणं याचं नाव संन्यास!

संन्यास आणि योग यामध्ये फरक नाही. योग म्हणजे जोडणं. ज्याचा जीव भगवंताशी कायमचा जोडला गेला तो योगी! आणि वृत्तीच्या संन्यासाशिवाय असा योग संभवत नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे ~~

ईश्वर दर्शन म्हणजे काय?



ईश्वरदर्शन म्हणजे काय?

१) ईश्वरी शक्तीने माणसाच्या जीवनाचा ताबा घेणे
२) माणसाच्या अंगी मुरलेला कर्तेपणाचा अभिमान शून्य अंशावर घसरणे
३) आपण ईश्वराच्या हातातील बाहुले आहोत अशी बालंबाल खात्री होणे
४) ईश्वर ठेवील तसे त्याच्या स्मरणात राहणे

*मन पूर्ण शांत होणे किंवा समाधान पावणे हा ईश्वरदर्शनाचा अथवा साक्षात्काराचा खरा अर्थ आहे.* या समाधानाला आत्मशांती अथवा स्वरूपशांती म्हणतात!

परमपूज्य बाबा बेलसरे (ईश्वर - स्वरूप आणि साक्षात्कार)

भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी .....



श्रीराम. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने, निर्व्याजपणे आणि उत्कटपणे त्याचे चिंतन करणे हा राजमार्ग आहे. मुखमध्ये नाम ठेवल्याने त्याचे चिंतन सुलभ होते.
हे करत असताना प्रापंचिक वासनातृप्तीचे पोषण करणाऱ्या सूचना आपण आपल्या मनाला देऊ नयेत. त्यामुळे वासनांचे कवच घट्ट होते.
अनुसंधानाने आपल्या मनोरचनेत भगवंताला अनुकूल अशी पुनर्रचना घडून येते. त्यास विरोधी वर्तन करू नये.
🌹🌹परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान: साधनेचा प्राण)🌹🌹

Tuesday, September 6, 2016

अजपाजप


श्रीराम. अजपाजप हा श्वासासारखा न लक्ष देता चालणारा सहज जप आहे. जप होतोय ही सुद्धा जाणीव नाही. इतकं नाम घेतलं पाहिजे की तो सहज स्वभाव झाला पाहिजे. पिंडच नाम बनला पाहिजे. इतकं नाम घ्यायला मात्र पाहिजे. त्याकरता मुख्य पथ्य काय? तर प्रपंचात जे घडतं त्याचा बिनतक्रार स्वीकार व्हायला हवा. मनातही 'हे असं का' हे न येणं हे त्यातलं मर्म आहे!

🌞परमपूज्य बाबा बेलसरे (सत्संग)🌞

मी तुला योग्य नाही!



श्रीराम. तुकाराम बुवा म्हणतात, मी तुला योग्य नाहीच आहे! याति हीन मति हीन कर्म हीन माझे। सांडोनिया सर्व लज्जा शरण आलो तुज।। येई गा तू मायबापा पंढरीच्या राया। तुजवीण शीण वाटे क्षीण झाली काया।।...अशी भावना कळकळीने आली पाहिजे. असा विचार करावा की जगात लाखो माणसं आहेत, त्यात मी माझेपण मिरवतो, ही भावना आली पाहिजे, आत कळवळलं पाहिजे की मी हीन, तुझ्याशिवाय मला कोणी नाही!

(पू बाबा सांगत आहेत), माझा पहिला मुलगा गेला, देह समोर पडला होता. सौ आईंना भेटायला श्रीमहाराज आले व म्हणाले, "आता दुःख पुरे." सौ आई म्हणाल्या, "माझी आतडी पिळवटतात". यावर महाराज मला म्हणाले, "भगवंत मला जवळ करत नाही म्हणून आतडी पिळवटली तर ते अंतःकरण शुद्धच होईल!" श्रीमहाराजांनी किती गोड सांगितलं! हा जवळचा मार्ग आहे. पगदंडी आहे, पाऊलवाट आहे. श्रीमहाराजांच्या समोर रडावं पण होतं असं की आपल्याला मी चुकलो, मी पाप केलं ही जाणीवच नाही. तुला आवडत नाही असं वागलोच नाही अशी खात्री पाहिजे आणि नामावर श्रद्धा पाहिजे!

🍁परमपूज्य बाबा बेलसरे (सत्संग)🌿

साधक कसा असावा?

|| श्रीराम समर्थ ||


Monday, May 16, 2016

भक्तीतला निरोध!


श्रीराम. योगातील चित्त वृत्तींचा निरोध बऱ्याच झटापटीनंतर साधतो. भक्तीत मात्र हा निरोध सहज असतो! धरणामध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी अडवले तर धरणाची भिंत पडण्याचा धोका असतो. पण त्याच पाण्याला दुसरीकडे वाट काढून दिली तर तो धोका टळतो. तसा मनाचा प्रवाह भगवंताकडे वळवला तर कोणताही धोका न होता निरोध साधतो.
म्हणून सातव्या नारद भक्तिसूत्रात म्हटले आहे- सा न कामयमाना निरोधरूपत्वात्।- जेव्हा असा सहज निरोध भक्तिमुळे साधतो, तेव्हा विषयवासनांना आपोआप अटकाव बसतो. पराभक्ति वासनांना पोषक असूच शकत नाही! वासना आहे पण वासना जे तन्निष्ठ! महाराज म्हणायचे, पूर्वेकडे तोंड करून बसलेल्याला पश्चिमेकडे पाठ कर म्हणून सांगावं का लागतं? तसं परमभक्ति ज्याच्या हृदयात उत्पन्न झाली त्याला विषय सोड म्हणून सांगावं लागत नाही!

भक्त कुणाला म्हणावे?



भक्त म्हणजे -


१) भगवंताला वाहिलेली, 

२) भगवंताच्या अनुसंधानात मुरलेली, 
३) भगवंताच्या स्मरणात धुंद झालेली, 
४) भगवंताने व्यापलेली, 
५) वासना मेलेली, 
६) अहंकार व कर्तेपण जळलेली व 
७) भूतमात्रांशी विनम्र झालेली व्यक्ती होय .

~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान- साधनेचा प्राण)

Wednesday, May 4, 2016

नवीन पुस्तके

श्रीराम. खालील पुस्तकांसाठी श्री अविनाश भाटे यांच्याशी संपर्क साधावा-- फोन नंबर खालील फोटोमध्ये दिलेला आहे. साधकांसाठी अतिशय मार्गदर्शक अशी पुस्तके आहेत.