श्रीराम. तुकाराम बुवा म्हणतात, मी तुला योग्य नाहीच आहे! याति हीन मति हीन कर्म हीन माझे। सांडोनिया सर्व लज्जा शरण आलो तुज।। येई गा तू मायबापा पंढरीच्या राया। तुजवीण शीण वाटे क्षीण झाली काया।।...अशी भावना कळकळीने आली पाहिजे. असा विचार करावा की जगात लाखो माणसं आहेत, त्यात मी माझेपण मिरवतो, ही भावना आली पाहिजे, आत कळवळलं पाहिजे की मी हीन, तुझ्याशिवाय मला कोणी नाही!
(पू बाबा सांगत आहेत), माझा पहिला मुलगा गेला, देह समोर पडला होता. सौ आईंना भेटायला श्रीमहाराज आले व म्हणाले, "आता दुःख पुरे." सौ आई म्हणाल्या, "माझी आतडी पिळवटतात". यावर महाराज मला म्हणाले, "भगवंत मला जवळ करत नाही म्हणून आतडी पिळवटली तर ते अंतःकरण शुद्धच होईल!" श्रीमहाराजांनी किती गोड सांगितलं! हा जवळचा मार्ग आहे. पगदंडी आहे, पाऊलवाट आहे. श्रीमहाराजांच्या समोर रडावं पण होतं असं की आपल्याला मी चुकलो, मी पाप केलं ही जाणीवच नाही. तुला आवडत नाही असं वागलोच नाही अशी खात्री पाहिजे आणि नामावर श्रद्धा पाहिजे!
🌿
परमपूज्य बाबा बेलसरे (सत्संग)
No comments:
Post a Comment