Translate

Tuesday, January 3, 2017

आज परमपूज्य बाबांचं १९ वं पुण्यस्मरण

परमपूज्य बाबांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन.


|| श्रीराम समर्थ ||

तनू जयांची कृश ओजस्वी
वदनी निर्मळ हास्य वसे।
मधुर भाषणें जनां मनाला
नित्य दिलासा लाभतसे॥

नयनां मधुनी स्नेह कृपेचा

अविरत हो वर्षाव खरा।
सदा सांगती तळमळुनी ते
श्रीरामाचे नाम स्मरा॥


तत्वज्ञान श्री महाराजांचे
साऱ्या जगता बोधियले।
आचरुनी ते स्वये जीवनीं
लोकां नामी लावियले ||


गुरु आज्ञा ही प्रमाण होती
सदा जीवनीं सर्व परी।
सुखदुःखाच्या वाटे वरती
महाराजांची साथ खरी॥


गुरुरायांचा आठव त्यांच्या 
कंठी गहिवर सहज भरे।
ओलावा नयनात दाटता
रोम रोम पुलकीत खरे॥


असे आमुचे बाबा त्यांच्या 
नित नत मस्तक चरणीं हे।
किती सांगती चला लावुया
मन नामाच्या स्मरणीं हे॥


|| जानकी जीवन स्मरण जयजयराम ||


~ स्वानंद ~

श्रीराम 

जये श्रीवचा 
             मानली वेदवाणी |
सदा स्वस्थ जे 
           जीवनीं रामनामीं  ||
किती बोधिती
        तळमळीने जिवाला |
नमस्कार त्या 
        पूज्य श्री केशवाला ||

श्रीराम

स्मरे नाम जो सर्वदा
                प्रीय ज्यांना ।
जया भेटता स्वस्थ 
               वाटे जीवांना ॥
निरोपास श्रीं च्या 
            जनां पोचवीला ।
नमस्कार त्या पूज्य
                श्री केशवाला ॥

               


           ..... स्वानन्द. 



Monday, January 2, 2017

संगत कुणाची करावी?



श्रीराम. ज्यांनी आपले जीवन नामाला वाहिलेले आहे अशांची संगत करावी. अशा व्यक्तीला नुसते जवळून पाहिल्याने व त्यास स्पर्श केल्याने आपली नाम घेण्याची प्रेरणा जोराने उमटते.

नामाचा आपला अभ्यास एका इयत्तेपर्यंत पोचल्यानंतरच नामात मग्न झालेल्या माणसाची व त्याच्या सहवासाची किंमत कळते!

नाममध्ये रमल्यामुळे ज्याला सद्गुरू सान्निध्याचे वरदान मिळाले त्याला मौज भोगण्यासाठी दसरा अन् दिवाळीची वाट पाहण्याची जरूर नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे ~~ 

संन्यास आणि योग



श्रीराम. भगवी वस्त्रे घालणे म्हणजे संन्यास नव्हे. संन्यास म्हणजे सोडणं आणि हे सोडणं वृत्तीचं आहे. जे भगवंताच्या आड येतं ते निश्चयानं सोडणं याचं नाव संन्यास!

संन्यास आणि योग यामध्ये फरक नाही. योग म्हणजे जोडणं. ज्याचा जीव भगवंताशी कायमचा जोडला गेला तो योगी! आणि वृत्तीच्या संन्यासाशिवाय असा योग संभवत नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे ~~

ईश्वर दर्शन म्हणजे काय?



ईश्वरदर्शन म्हणजे काय?

१) ईश्वरी शक्तीने माणसाच्या जीवनाचा ताबा घेणे
२) माणसाच्या अंगी मुरलेला कर्तेपणाचा अभिमान शून्य अंशावर घसरणे
३) आपण ईश्वराच्या हातातील बाहुले आहोत अशी बालंबाल खात्री होणे
४) ईश्वर ठेवील तसे त्याच्या स्मरणात राहणे

*मन पूर्ण शांत होणे किंवा समाधान पावणे हा ईश्वरदर्शनाचा अथवा साक्षात्काराचा खरा अर्थ आहे.* या समाधानाला आत्मशांती अथवा स्वरूपशांती म्हणतात!

परमपूज्य बाबा बेलसरे (ईश्वर - स्वरूप आणि साक्षात्कार)

भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी .....



श्रीराम. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने, निर्व्याजपणे आणि उत्कटपणे त्याचे चिंतन करणे हा राजमार्ग आहे. मुखमध्ये नाम ठेवल्याने त्याचे चिंतन सुलभ होते.
हे करत असताना प्रापंचिक वासनातृप्तीचे पोषण करणाऱ्या सूचना आपण आपल्या मनाला देऊ नयेत. त्यामुळे वासनांचे कवच घट्ट होते.
अनुसंधानाने आपल्या मनोरचनेत भगवंताला अनुकूल अशी पुनर्रचना घडून येते. त्यास विरोधी वर्तन करू नये.
🌹🌹परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान: साधनेचा प्राण)🌹🌹